ओला कचरा , सुका कचरा वेगळा करा असा महानगरपालिकेचा फतवा आला आणि पाठोपाठ हिरव्या आणि पांढऱ्या डब्याचा ढीग येऊन पडला. (आता नीळा झालाय पांढऱ्या ऐवजी ).

पहिला प्रश्न -कशाला ओला म्हणायचं आणि कशाला सुका. म्हणजे फ्लॉवर भाजी गड्डा कोरडाच असतो तर त्याला ओला का म्हणायचे? प्लॅस्टिकची ओली दुधाची पिशवी कोरड्या कचऱ्यात का टाकायची? बर विचारणार तरी कोणाला, सगळेच ह्यात नवशिके. पण मग काही अनुभवी लोकांची गाठ पडली, आणि कचरा विभाजन कंपोस्ट कधी इंटरेस्टचा विषय बनला हे कळलेच नाही. कचऱ्याला हात लावायला नको वाटणारी मी बिनधास्त हाताने पालापाचोळा गाडीत घालून भरून आणू लागले.

कंपोस्टिंगची सुरुवात
आधी घरचा हिरवा पाला, देठ यांनी सुरवात केली. कंपोस्ट कल्चर पावडर आणून घातली. मग तो कचरा जेव्हा खूप साठला तेव्हा नेमका पावसाळा सुरू झाला, आणि इथं गणित चुकलं. एकदम कंपोस्टिंगच्या डब्यातून पावसाच्या वेगाने पाणी बाहेर येऊ लागले.हळुहळु कुजका वास येऊ लागला, अळ्या झाल्या. अरssss काहीतरी चुकलं बहूतेक.मग फेकून देऊया हा विचार मनात पक्का झाला.पण लगेच गिल्ट सुरू, की अरे आपण परत हे सगळं उकिरड्यात नेऊन घाण वाढवणार…मोठाच पेच.

मग काय, अनेकांना फोन , sms, whatsapp ग्रुप..एकच सवाल काय करू ह्याच? कसं निस्तरू?

मग लक्षात आलं की पावसामुळे हवेतला दमतपणा वाढला आणि हिरवा पाला जास्त झाला की अस पाणी सुटतय. मग उपाय सुरू. कोणी म्हणाले की लाकडाचा भुस्सा घाला. पण तो कुठे मिळणार? आता वखारी पण कमी झाल्या आहेत. कसाबसा पत्ता मिळाला आणि एकदाचा भुस्सा मिळाला. मग कंपोस्ट मधील पाणी जरा कंट्रोल मध्ये आलं. वास पण कमी झाला. पण हे सगळं होईपर्यंत मनात सतत धाकधूक की आता ह्यात अळ्या झाल्या आणि सर्व बिल्डिंग भर पसरल्या तर आपले हे प्रयोग बंद होणार की काय? पण तसं काही घडलं नाही आणि कंपोस्टिंग सुरू राहिलं.

पालापाचोळा संकलन
मग माहिती कळली की पाला पाचोळा कोरडा असेल तर मग भुश्शाऐवजी ते आपण वापरू शकतो. मग त्याची जमवाजमव सुरू. आधी स्वतःची सोसायटी झाली, मग शेजारची, मित्र मैत्रीणि ज्यांच्या बागा आहेत त्यांना सांगून रिकामी पोती त्यांना देऊन आले. मग असे काही व्हाट्सउप ग्रुप आहेत जे पालापाचोळा व्यवस्थापन करतात असं कळलं, मग त्याची सभासद झाले. आपण उन्हाळ्यात पापड, कुरडया असे साठवण करतो, तसे मी पानगळीच्या महिन्यात पाने साठवायला लागले. पोतीच पोती. आमच्या बिल्डिंगचा वॉचमन मला जवळपासच्या सोसायटी मधून वाळकी पाने आणून देऊ लागला.

नोव्हेंबर महिना आला आणि पानगळ सुरू झाली. भरपूर पाने रस्त्यात, सोसायटी मध्ये दिसू लागली. साठवायला पिशव्या कमी पडतात म्हणून पोती आणली, मग ड्रम, फुटके प्लास्टिक डबे, मग जमिनीवर विटांचे चौकोनी पीट बनवले. विटा संपल्या तेव्हा रस्त्यात फेकलेले तुटलेले pavement ब्लॉक्स वापरले. ग्रुप मध्ये असणारे मित्र मैत्रिणी अनेक वेगवेगळ्या गोष्टी वापरत त्या पहिल्या.त्यात आवडलेली गोष्ट म्हणजे प्लास्टिक किंवा लोखंडी जाळीचे गोल बागेत ठेवले आणि त्यात पाने जमा केली. त्यावर शेणाचा काला करून ओतला.४, ५ महिन्यात छान खत झाले.

सुरुवात केली तेव्हा ऐकून पोती आणली आणि पाने साठवली, पण त्यातही चूक होते हे करून पाहिल्यावर कळलं ते अस की पोती प्लॅस्टिकची असली तर त्याला भोक पाडायला लागतात,नाहीतर हवा खेळती राहात नाही.पोती गोणपाटाची असतील तर हा प्रश्न येत नाही.

ATM

हवा खेळती राहणे, दमटपणा हवा तितका असणे आणि योग्य तपमान राखणे ही त्रिसूत्री लक्षात आली( ATM – air, temparature and mosture). अजून एक, काही चुकलं तर कॉम्पोस्ट साठी लागणार वेळ कमी जास्त होतो, पण शेवटी सगळ्याची माती होतेच.

खूप शास्त्रीय ज्ञान हवे असेल तरी नेटवर बरेच वाचायला मिळते.पण एवढा वेळ आणि उत्साह सगळ्याकडे नसतो. पण प्रयोग करणारी अनेक माणसे नवीन कंपोस्ट करणाऱ्या लोकांना खूप मदत करतात.केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ह्या उक्ती प्रमाणे गेली ३-४ वर्षे हे सर्व करून पहातेय. माझी पूर्ण फॅमिली ह्यात आहे. शेजारी आणि आमचे सोसायचीचे रखवालदार उदयसिंग देखील ह्यात मनापासून सहभागी आहेत. ते सुध्दा भाजीवल्याकडून खराब झालेला भाजीपाला आणून आमच्या कंपोस्टिंग ड्रममध्ये भर घालतात.

निर्माल्यापासून खत

निर्माल्य हा एक मोठा विषय चर्चेत होता.फुलाचे कंपोस्ट करतात त्याचे विडिओ पाहिले. घरची देवाला वाहणारी फुल फार कमी असतात, मग शेजारी मदतीला आले. दसरा, पाडवा यावेळी दाराला आणि गाड्याना हार घालतात, त्यांना सांगितले की तुम्ही ते न फेकता मला द्या. त्यांनीही पिशवी भरून आणून दिली.ऑफिसमधील माझ्या मैत्रिणीही माझ्या ह्या वेडाविषयी परिचीत झाल्या. त्यांनी पण घरचे निर्माल्य आणून द्यायला सुरुवात केली. कुठे बाहेरगावी गेल्या आणि भरपूर वाळकी पाने दिसली की त्यांचा आवर्जून फोन येतो, ” अग, इतकी पाने आहेत इथे पण आणता येत नाहीत. पण तुझ्या कंपोस्टची आठवण येते.”

देवळात गेलं तरी आधी मनात यायचं की अरे एवढी वाहिलेली फुलं उद्या हे कच-यात फेकणार. आपल्याला दिली तर उपयोगी होतील. पण बरेच वेळा ते शक्य नसतं, मग वाईट वाटतं. कचऱ्यातून कला नाही, पण मला कंपोस्ट दिसू लागलं. एखादा पदार्थ छान जमला की गृहिणी जशी आनंदी होते, तशी पोतंभर काळेभोर कंपोस्ट झाले की मला खूप आनंद व्हायला लागला . माझ्या शेजाऱ्यांनी पण हे बघून हळूहळू कंपोस्ट बनवायला सुरुवात केली, त्याचा जास्त आनंद झाला.

सेंद्रीय पद्धतीने बागकाम करणारी हौशी मंडळी पण माती विकत न आणता, पाला पाचोळा कुजवून व घरच्या भाज्या, खरकटे याचा वापर करून कंपोस्ट करतात आणि तेच मातीच्या ऐवजी वापरतात. शहरात पण बाल्कनी मध्ये हौसेनी फुलझाडे लावणारे लोकहि हे वापरून बाग फुलावतात हे कळले . मग त्या बागा बघणे हा एक छंदच लागला. प्रत्येकाकडून काही नवीन टिप्स मिळाल्या.

पाचोळा खत आणि vermi कंपोस्ट

कंपोस्ट मध्ये भरपूर गांडुळ झाली की बरेच लोकांना घाण वाटते, पण फक्त पाला पाचोळा असेल आणि काही culture पावडर मिळते ती घातली तर छान माती तयार होते आणि झाडे लावण्यासाठी वापरता येते हे हि लक्षात आले. पण गांडूळ असली तर vermi कॉम्पोस्ट छान होत हे कळल्यावर गांडूळ कशी वाढतील ह्यासाठी मी प्रयत्न करू लागले. केळी साले, अंडी टरफले असतील तर गांडूळ पटकन वाढतात असे काहींनी सांगितले. मग केळी वाल्याकडून साले आणणे, कॅन्टीन मधून टाकलेली अंड्याची टरफले आणणे हे हि केले आणि करतेय. भरपूर गांडूळ पाहून आनंदी होऊ लागले. जळीस्थळी कचरा, कंपोस्ट आणि त्यात उगवलेली छान झाडे एवढंच मनात.

फुलबाग आणि त्यामुळे येणारे रोजचे पाहुणे

हे कंपोस्ट अतिशय उत्कृष्ठ खत असते. मग ते वापरून माझ्या मिस्टरांबरोबर झाडे लावू लागले. झाडांमुळे पक्षी परत बागेत यायला लागले. सगळ्यात आनंद झाला तो हल्ली शहरातून हद्दपार झालेल्या चिमण्या रोज येऊ लागल्या तेव्हा. बुलबुल, नाचणं, सुर्यपक्षी, चष्मेवाला, रॉबिन, कोकीळ, भारद्वाज असे रोज फेऱ्या मारू लागले. सुरवंटाची फुलपाखरे होताना पाहिली. ह्यात किती आनंद असतो ते जाणवलं.

कंपोस्टिंग इतर फायदे

कंपोस्टींग मुळे अजून एक फायदा झाला की आपण रोज किती कचरा निर्माण करतो ह्याच्या अगदी वजनाचा नाही पण निदान आकारमानाचा अंदाज आला. पर्यावरणावर प्रेम करणारे अनेक लोक ओळखीचे झाले. त्याच्याकडून कंपोस्ट बरोबर इतर अनेक गोष्टीचे ज्ञान पण मिळाले. चांगले मित्रमंडळ जमले.

कंपोस्टिंग काळाची गरज

विनोदाचा भाग सोडून दिला तरी आता खरोखरच प्रत्येकाने घरचा ओला कचरा आणि वाळकी पाने घरी साठवून कंपोस्ट करायची वेळ आली आहे. हे सर्व वाचून उत्सुकता म्हणून १० जणांनी जरी हे काम सुरू केले तर मला मिळालेला आनंद त्यांनाही मिळेल. मग मंडळी करताय न कंपोस्टिंगला सुरुवात?

One Response

  1. बहुत ही उपयोगी व आवश्यक लेखन ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *